बारामती : न्यूज कट्टा
पराराज्यातील जेसीबीच्या पासिंगसाठी हस्तकामार्फत ७० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आणि खासगी व्यक्ती राजेश माहेश्वरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राजेंद्र केसकर यांच्या पुण्यातील घराची झाडाझडती घेतल्यानंतर तब्बल सव्वाचार कोटींची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली आहे. त्यामुळं खळबळ उडालेली असून बारामतीत काही वर्षे काम केलेल्या या अधिकाऱ्याच्या उद्योगांची जोरदार चर्चा झडू लागली आहे.
बारामतीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम केलेल्या राजेंद्र सदाशिव केसकर यांची नुकतीच गोंदिया येथे बदली झाली होती. त्या ठिकाणी राजेश रामनिवास माहेश्वरी (वय ५७) हा केसकर यांचा हस्तक म्हणून काम पाहत होता. त्याने एका परराज्यातील जेसीबीच्या पासिंगसाठी ७० हजारांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ४ डिसेंबर रोजी ७० हजारांची लाच स्वीकारताना राजेश माहेश्वरी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर या दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजेंद्र केसकर यांच्या पुण्यातील घरी छापा टाकल्यानंतर मोठं घबाड मिळून आलं आहे. यामध्ये ६ लाख ६६ हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने यासह स्थावर व जंगम मालमत्ता, घर, प्लॉटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे असा एकूण ४ कोटी २५ लाख रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. या अधिकाऱ्याचे वेतनमानापेक्षा ही संपत्ती अधिक असल्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर बारामतीसह गोंदियात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजेंद्र केसकर या अधिकाऱ्याच्या आतापर्यंतच्या सेवा काळाची माहिती लाचलुचपत विभागाकडून माहिती घेतली जात आहे. पूर्वी जिथे जिथे काम केले त्या ठिकाणी असे काही व्यवहार झाले आहेत का याचीही तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे, केसकर यांनी बारामतीतही खासगी एजंटांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी खास व्यक्ती नेमला होता. त्याच्याकडून सर्व कलेक्शन जमा करून ते केसकर यांच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं. त्यातूनच केसकर हे गब्बर झाल्याचे आता बोलले जात आहे.





