बारामती : न्यूज कट्टा
बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील ३८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले. त्यानंतर संबंधित फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार (दोघेही रा. बारामती) यांनी ही लूट केल्याचं निष्पन्न केलं. त्यानुसार या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरून नेलेले दागिने, दागिने विक्रीतून मिळालेली १ लाख ४० हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पो.उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार व दादा दराडे यांनी ही कारवाई केली.





