बारामती : न्यूज कट्टा
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील कला केंद्रात काम देण्याचं आमिष दाखवून बारामती तालुक्यातील तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनंतर बारामती तालुका पोलिसांनी चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून काम देण्याच्या बहाण्याने अत्याचाराच्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील एका मुलीला नृत्य आणि गायनाची आवड होती. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधून आपल्या कला केंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असल्याचं सांगितलं. तुमच्या मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील असं या महिलेनं सांगितलं.
या महिलेवर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला त्यांच्याकडे पाठवलं. त्यानंतर या मुलीला अंबाजोगाई येथील पायल कला केंद्र येथे नेण्यात आलं, मात्र तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यामुळं बदामबाई आणि तिच्या इतर साथीदारांनी पिडीत मुलीला बेदम मारहाण केली. त्यानंतर या मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेण्यात आलं. त्या ठिकाणी तिला तिघांच्या ताब्यात देऊन बदामबाई निघून गेली. मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला.
या घटनेनंतर तिला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे सोडण्यात आलं. त्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडण्यात आलं. त्यामुळं भयभीत झालेल्या पीडितेने आपल्या आईशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी महिला तातडीने अंबाजोगाई येथे जाऊन आपल्या मुलीची सुटका करत तिला बारामतीला आणलं आणि थेट बारामती तालुका पोलिस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तालुका पोलिसांनी बदामबाई गोकुळ हिच्यासह मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.





