पुणे : न्यूज कट्टा
पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आता प्रत्यक्षात येवू लागल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत प्राथमिक चर्चा केली असून येत्या दोन-तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशातच या निर्णयाबाबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे खंडन केलं असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादीशी मात्र मैत्रीपूर्ण लढत होईल असं स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत प्राथमिक चर्चा केली आहे. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी दर्शवली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त माध्यमातून आले. प्रत्यक्षात मात्र प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं आहे. आपण आजच खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर आपला निर्णय जाहीर करू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं प्रशांत जगताप हे वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.





