बारामती : न्यूज कट्टा
उधारीवर सिगरेट देण्यास नकार देणाऱ्या टपरी चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जाब विचारणाऱ्या पिता-पुत्रांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली आहे. या घटनेत चौघेजण जखमी असून त्यामध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी प्रतीक सुनील जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक महादेव जगताप, महादेव विश्वनाथ जगताप, गिता महादेव जगताप, काजल महादेव जगताप (सर्व रा. सांगवी ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीची सांगवी गावात पानटपरी आहे. आरोपी अभिषेक जगताप हा उधारीवर सिगरेट मागत होता. मात्र त्याला नकार दिल्यामुळे त्याने प्रतिकला शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा लहान भाऊ सार्थक जगताप याला समजल्यानंतर तो आपल्या भावाला घेऊन आरोपीच्या घरी गेला.
झालेल्या प्रकाराबाबत काहीही ऐकून न घेता महादेव जगताप, त्याची पत्नी गीता जगताप, मुलगी काजल जगताप या तिघांनी या दोघा भावांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी फिर्यादीचे वडील सुनील जगताप भांडण सोडवण्यासाठी आले. त्यावेळी अभिषेक जगताप याने घरातील कोयता आणून त्यांच्या डोक्यात पाठीमागून वार केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेल्यानंतर सार्थकच्याही डोक्यावर वार केला. आरडाओरडा ऐकून घटनास्थळी गेलेल्या फिर्यादीच्या आजी उषा जगताप यांनाही गीता आणि काजल जगताप यांनी मारहाण करत ढकलून दिले. त्यामध्ये त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.
या घटनेत जखमी झालेल्या सुनील जगताप, सार्थक जगताप, फिर्यादी प्रतीक यांना उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रतीक जगताप याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार संजय मोहिते करत आहेत.





