BIG NEWS : अजितदादा नासाबद्दल बोलत होते अन् मोकाट जनावरांबाबत चिठ्ठी आली; दादा म्हणाले, आण रे नारळ, याचा सत्कारच करू..!

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणातील मिश्किलीसाठी प्रसिद्ध आहेत. आज कन्हेरीतील सभेत अजितदादा जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नासात पाठवल्याबद्दल माहिती देत होते. त्याचवेळी एकानं गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी चिठ्ठी दिली. त्यावर अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देत मला नारळ द्या, आता याचा सत्कारच करू असं म्हणत टिपणी केली. त्याचवेळी त्यांनी जुन्या काळात कन्हेरी काटेवाडी परिसरातली मोकाट जनावरं पकडून सोडल्याची आठवणही सांगितली.

बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कन्हेरी येथे आज राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, नगराध्यक्ष सचिन सातव, माळेगावचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील गोरागारीबांची मुले अमेरिकेतील नासामध्ये गेल्याची माहिती दिली. याबद्दल बोलत असतानाच एकानं मुढाळे गावात मोकाट गायींचा बंदोबस्त करण्याबाबत चिठ्ठी दिली. त्यावर मी इथं नासाबद्दल बोलतोय, हा मोकाट जनावरांचं सांगतोय. अरे आणा रे नारळ.. याचा सत्कारच करू असं म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. असं बोलत असताना मध्येच काहीतरी आलं की माझी लिंक तुटती आणि तिथंच सगळं वाटोळं होतं असं सांगायला ते विसरले नाहीत.

याचवेळी अजितदादांनी जुन्या आठवणीलाही उजाळा दिला. मागे आम्ही लहान असताना कन्हेरी, काटेवाडी परिसरात आम्ही मोकाट जनावरं पाठलाग करून पकडलीत आणि त्यांना उजनीच्या पलीकडे नेऊन सोडलंय. आता मी इतकं चांगलं सांगत होतो आणि ह्यानी मध्येच मोकाट जनावरांचं आणलंय. पण हरकत नाही ते माझं काम आहे, मी ते मार्गी लावून देईन; याबद्दल काळजी करू नका असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नेहमीच कामाला प्राधान्य देणारे अजितदादा भाषणात हलकेफुलके विनोद करत असतात. आजही त्यांनी भाषणाच्या मध्येच आलेल्या चिठ्ठीवरून टोलेबाजी करत त्यांच्या मिश्किल स्वभावाची चुणूक दाखवली. एरवी धीरगंभीर वाटणारे अजितदादा सर्वसामान्यांच्या सान्निध्यात मनमोकळे असतात याचीच प्रचिती या निमित्तानं उपस्थितांना आली.            

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!