BARAMATI BREAKING : नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक; सुप्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना अचानक काय घडलं..?

बारामती : न्यूज कट्टा    

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर आज सुपे येथे शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना अचानकपणे आलेल्या कार्यकर्त्यांनी ही शाई फेकली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यानं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचं बोललं जात आहे.

काल प्रजासत्ताकदिनी बारामती नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नव्हता. त्यावरून बहुजन संघटनांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता. त्यानंतर आज बारामती नगरपरिषदेसमोर आंदोलनही करण्यात आलं. याचदरम्यान, आज नगराध्यक्ष सचिन सातव हे सुपे परिसरात गेले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्याचवेळी ही शाईफेकीची घटना घडली.

सुप्यातील एका हॉटेलमध्ये बसून सातव हे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बारामती नगरपरिषदेत काल घडलेल्या प्रकाराबाबत विषय काढला. त्यावर सचिन सातव यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी एका कार्यकर्त्यानं त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानंतरही सचिन सातव हे संयम बाळगून कालच्या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावर सचिन सातव यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला.

सचिन सातव यांनी या घटनेनंतर संबंधित कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र घोषणा देत हे कार्यकर्ते निघून गेले. दरम्यान, कालच्या बारामती नगरपरिषदेतील घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!