मुंबई : न्यूज कट्टा
राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा अखेर दोन दशकांनंतर निकाल लागला असून, विशेष सीबीआय न्यायालयाने माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आठ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने निकाल देताना माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या जबाबावर गंभीर शंका उपस्थित केली. त्याचे जबाब विसंगत व विश्वासार्ह नसल्याने केवळ त्याच्या साक्षीच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण
३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून धाराशिवकडे जात असताना कळंबोली येथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला अडवून गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेतून भाडोत्री मारेकऱ्यांमार्फत हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. ते पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत.
दरम्यान, निकाल वाचताना विशेष सीबीआय न्यायालयाने तपासातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याचे दोन कबुलीजबाब परस्परविरोधी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी पुन्हा नोंदविण्यात आलेल्या जबाबावर संबंधित न्यायाधीशांची स्वाक्षरी नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयच्या तपासावरही ताशेरे ओढले.
या खटल्यात एकूण १२७ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. अनेक वर्षे रायगड न्यायालयासह विविध स्तरांवर सुनावणी झाल्यानंतर अखेर विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, आजच्या निकालानंतर या खटल्यातून पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे या आठजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.





