बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेमध्ये माहिती विचारण्यासाठी गेलेल्या सामान्य नागरिकांशी उद्धटपणे वर्तन करून अरेरावीची भाषा वापरणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी सचिन लक्ष्मण खोरे यांच्याविरुद्ध सोहेल गुलमोहम्मद शेख यांनी तक्रार करत केली होती.
सचिन खोरे यांच्यावर बारामती शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, सोहेल शेख हे बारामती नगरपरिषदेत एका कामाच्या संदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता, तेथील कर्मचारी सचिन खोरे यांनी त्यांना योग्य माहिती न देता त्यांना उद्धट उत्तरे देत अरे-तुरेची व अत्यंत आक्रमक भाषा वापरली. या संपूर्ण प्रकाराचे सोहेल शेख यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले.
याबाबत सोहेल शेख यांनी विविध पातळीवर पाठपुरावा करत कारवाईची मागणी केली, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या संपूर्ण घटनेचा डिजिटल व ऑडिओ-व्हिडिओ पुरावा घेऊन त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी याची दखल घेत बारामती नगरपरिषदेचे कर्मचारी सचिन खोरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयात अथवा अधिकाऱ्याकडून जर आपल्यावर अन्याय होत असेल, अपमान केला जात असेल किंवा कोणी उद्धटपणे बोलत असेल, तर घाबरून न जाता त्याचे पुरावे घेऊन थेट पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सोहेल शेख यांनी केले आहे.





