BARAMATI WATER : बारामतीच्या पाणीप्रश्नावर सुनेत्रावहिनी अॅक्शन मोडमध्ये; जळोची-तांदुळवाडी योजना नगरपरिषदेकडे देण्याचे आदेश, तालुक्यातील योजनांचाही घेतला आढावा

मुंबई | न्यूज कट्टा

बारामती शहर आणि परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी थेट हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जळोची आणि तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे तातडीने हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच साठवण तलावांची गळती रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बारामती शहरासह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, नगराध्यक्ष सचिन सातव, प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्याधिकारी पंकज भुसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, गटनेते संजय संघवी आणि नगरसेवक अल्ताफ सय्यद उपस्थित होते.

बैठकीदरम्यान बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेली कामे तात्काळ नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच टप्पा-२ मधील प्रलंबित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश सुनेत्रा पवार यांनी दिले.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये आढळून आलेल्या गळतीचीही गंभीर दखल घेण्यात आली. नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेत तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तालुक्यातील एकूण २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित, दर्जेदार आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बारामतीची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असल्याचे नमूद करत, सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि वेळबद्ध पद्धतीने काम करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!