LOHGAD MURDER : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; सत्य समोर आणण्यासाठी सिया गोयलची लाय-डिटेक्टर चाचणी होणार..?

पुणे । न्यूज कट्टा

पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना पोलिसांनी महत्त्वाची माहिती सादर केली आहे. लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल यांना नेमके कोणी दरीत ढकलले, याचा कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे मुख्य आरोपी सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर (पॉलिग्राफ) चाचणी’ करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आली आहे.

पोलिसांच्या मते, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब नोंदविण्यात आले असले तरी तपासाला पुढे नेण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी आवश्यक आहे. या चाचणीतून तपासाला उपयुक्त ठरणारी नवी माहिती मिळू शकते, असा पोलिसांचा विश्वास आहे. मात्र, अशा चाचण्यांचे निष्कर्ष न्यायालयात स्वतंत्र आणि अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत.

केतनच्या हत्येचा कट कसा रचला?

तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयात दावा केला की, सिया गोयलला केतन अग्रवाल यांच्याशी झालेला साखरपुडा मोडायचा नव्हता. साखरपुडा मोडल्यास समाजात स्वतःची आणि कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीतून तिने केतनचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. त्याचा मृत्यू अपघातासारखा भासवण्याची योजना आखण्यात आली होती. इतकेच नव्हे तर मूळ योजना फसल्यास ‘प्लॅन बी’ आणि ‘प्लॅन सी’ देखील तयार ठेवण्यात आले होते. या कटात तिचा प्रियकर चेतन चौधरीने सक्रिय साथ दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मुद्दाम गायब केला पासपोर्ट

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई विमानतळाकडे जाताना एका मॉलमध्ये थांबल्यानंतर सियाने केतनचा पासपोर्ट चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो फाडून जाळून टाकल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. लग्नापूर्वी कुटुंबाने बाली सहलीचे नियोजन केले होते; मात्र विमानतळावर पासपोर्ट न सापडल्यामुळे संपूर्ण सहल रद्द करावी लागली होती.

मोबाईलमधील पुरावे नष्ट केल्याचा संशय

पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांचा मोबाईल काही काळ सिया गोयलकडे होता. त्यानंतर तिने तो अग्रवाल कुटुंबाकडे परत दिला. या कालावधीत मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे डिलीट किंवा नष्ट करण्यात आले आहेत का, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

३०० फूट दरीत डमी फेकून पुनर्रचना

घटनेची पुनर्रचना करण्यासाठी पोलिसांनी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेले. केतन अग्रवाल यांच्या उंची आणि वजनाशी साधर्म्य असलेला फायबरचा डमी सुमारे ३०० फूट खोल दरीत फेकून संपूर्ण घटनाक्रमाची चाचणी करण्यात आली. या प्रयोगातून तपासातील काही महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा सिया गोयल हिच्याशी साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!