पुणे | न्यूज कट्टा
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाईत मोठा पर्दाफाश केला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंचर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा उलगडा झाला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दुधात शॅम्पू, पावडर आणि घातक रसायनांची भेसळ
तपासादरम्यान समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक आहे. दूध उत्पादकांकडून डेअरीत आलेल्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात होती. ५०० लिटर दुधात तब्बल ३०० लिटर, तर १००० लिटर दुधात ५०० लिटरपर्यंत भेसळ करण्यात येत होती. दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात वास नसलेला शॅम्पू, दुधाची पावडर, विविध रासायनिक पदार्थ आणि पाणी मिसळून बनावट दूध तयार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नामांकित कंपन्यांना पुरवठा..?
या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा बाजारातील काही नामांकित ब्रँड्स आणि कंपन्यांना होत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या दुधापासून तयार झालेले पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ गेल्या दोन वर्षांपासून बाजारात विक्रीसाठी येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, तपास यंत्रणा या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेत आहे.
सखोल तपास होणार
या रॅकेटमध्ये काही मोठे डेअरी चालक आणि इतर संबंधितांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आगामी काळात आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे.
बारामती–इंदापूरमधील दूध भेसळीवरही प्रश्नचिन्ह
बारामती आणि इंदापूर तालुके हे राज्यातील प्रमुख दुग्धउत्पादक पट्टे म्हणून ओळखले जातात. या भागातील लाखो लिटर दूध दररोज विविध डेअऱ्यांमार्फत राज्यभर आणि राज्याबाहेर पाठवले जाते. त्यामुळे या मोठ्या कारवाईनंतर बारामती आणि इंदापूर परिसरातही दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया व्यवस्थेची चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात या तालुक्यांतील कोणत्याही डेअरी किंवा दूध उत्पादकाचा सहभाग असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही; मात्र संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी झाल्यास वास्तव स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या भागातही विशेष तपास मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





