पुणे । न्यूज कट्टा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे देहू आणि आळंदी परिसरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला असून या भागात जाणे सध्या धोकादायक ठरू शकते.
यंदाची वारी १० जुलै रोजी पुण्यात दाखल होणार असल्याने वारकऱ्यांनी देहू किंवा आळंदीत मोठ्या प्रमाणावर गर्दी न करता थेट पुण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
वारीसाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणावर जर्मन हँगर उभारून सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था केली जात असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग समन्वयाने युद्धपातळीवर कार्यरत आहेत. वारकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.





