पुणे : न्यूज कट्टा
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीवरून ही हत्या क्षणिक रागातून नव्हे, तर अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या सिया गोयलच्या मोबाईलमधील डिजिटल पुरावे आणि गुगल सर्च हिस्ट्रीमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने हत्या करण्यापूर्वी प्रत्येक टप्प्याचे नियोजन केले होते. केतनची हत्या कशी करायची, संशय स्वतःवर येऊ नये यासाठी काय करावे, गुन्ह्यानंतर पोलिसांची दिशाभूल कशी करावी, अशा अनेक विषयांवर तिने इंटरनेटवर सखोल माहिती शोधली होती.
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे सियाने आधी गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीने कोणत्या चुका केल्या आणि त्या चुका टाळून गुन्हा कसा करता येईल, याचाही अभ्यास तिने केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
इतकेच नव्हे, तर हत्या केल्यानंतर पोलिस आपल्यापर्यंत पोहोचल्यास काय होऊ शकते, याचाही सियाने आधीच विचार केला होता. “महिला आरोपींना पोलिस कोठडीत मारहाण केली जाते का?”, “थर्ड डिग्रीचा वापर होतो का?” अशा स्वरूपाचे प्रश्नही तिने गुगलवर शोधल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्यामुळे गुन्हा करण्यापूर्वीच अटक होण्याची शक्यता गृहीत धरून तिने तयारी केल्याचा संशय अधिक बळावला आहे.
पोलिसांनी सियाचे दोन मोबाईल जप्त केले असून, त्यातील डेटा विश्लेषणातून हे सर्व पुरावे समोर आले आहेत. दुसरीकडे चेतन चौधरीही मोबाईलद्वारे सतत सियाच्या संपर्कात होता. दोघेही एकमेकांशी सांकेतिक भाषेत संवाद साधत असल्याचेही तपासात आढळून आले आहे.
तपासानुसार, दोघांनी १८ जून रोजी गोड बोलून केतन अग्रवालला लोहगडावर बोलावले. आधीच आखलेल्या कटानुसार त्याला विंचूकाटा पॉइंटपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेनंतर सिया गोयलचा वावर अत्यंत सामान्य होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा आणि सातत्याने केलेल्या चौकशीच्या आधारे तिची कोंडी केली. अखेर चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चेतन चौधरीचाही सहभाग उघड झाला.
या संपूर्ण प्रकरणात सियाची गुगल सर्च हिस्ट्री हा तपासातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला. हत्या करण्यापासून ते पोलिस तपासाला चकवा देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा शोध तिने इंटरनेटवर घेतला होता. मात्र, हे सर्व सर्च डिलीट करण्यास ती विसरली आणि त्याच डिजिटल पुराव्यामुळे तिचा संपूर्ण कट उघडकीस आला.
सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, १६ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पोलिस पुढील तपास अधिक वेगाने करत आहेत





