पुणे | न्यूज कट्टा
प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली. या प्रकरणी तरुणीच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जान्हवी पाठक (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या जान्हवीच्या काकांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३, मूळ रा. पहाडगंज, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जान्हवी आणि अमृतकुमार हे एकमेकांच्या परिचयाचे होते. दोघांचे शालेय शिक्षणही एकत्र झाले असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. जान्हवीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात राहत होती. खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत ती संगणक अभियंता म्हणून कार्यरत होती. तर अमृतकुमार नोएडा येथील एका आयटी कंपनीत काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमृतकुमार दोन दिवसांपूर्वी जान्हवीला भेटण्यासाठी नोएडाहून पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये मारहाणही झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली आला. त्याचदरम्यान जान्हवीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? त्यांच्या नात्यातील तणावाचे कारण काय होते? या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचा तपास खराडी पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





