बारामती : न्यूज कट्टा
बारामती येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका रेखा नरुटे-धनगर यांना राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेसबॉल या क्रीडा प्रकारात रेखा नरुटे-धनगर यांनी केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.
बारामती येथील अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक असलेल्या रेखा नरुटे-धनगर यांनी बेसबॉल या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आजवर अनेक पदके मिळवली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बेसबॉल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. याबद्दल त्यांना राज्य शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रेखा नरुटे-धनगर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, अनेकान्त स्कूलचे चेअरमन चंद्रवदन मुंबईकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.





