मुंबई : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस राज्यभरात साजरा होत आहे. मुंबईत मंत्रालय परिसरात तर मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. यातच एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही मत कुणालाही दिलं हे नाही बघणार; आपलं काम आणि संरक्षण दादाच करणार असा आशय या बॅनरवर नमूद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी लावलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
२२ जुलै हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. आज राज्यभरात विविध कार्यक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस साजरा होत आहे. अजितदादांचा वाढदिवस सर्व स्तरातून साजरा होत असताना मुंबईतही मोठ्या प्रमाणात बॅनर लावत कार्यकर्त्यांनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील मंत्रालय परिसरात अजितदादांच्या बॅनरची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी लावलेले बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
तुम्ही मत कोणाला दिलं हे कधी नाही बघणार; आपले काम आणि संरक्षण दादाच करणार असा आशय नमूद करत या बॅनरद्वारे अल्पसंख्यांक समाजाला आवाहन करण्यात आलं आहे. अजितदादांनी भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला असला तरी त्यांनी आपली भूमिका सोडलेली नाही. आजही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन ते वाटचाल करत आहेत. अल्पसंख्यांक समाजासाठीही अजितदादा धोरणात्मक निर्णय घेत असल्याचं सलीम सारंग यांनी या बॅनरविषयी बोलताना सांगितलं.
भाजपसोबत युती केल्यामुळे अजितदादांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आजही दादांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांची सर्वसामान्यांबद्दल असलेली आत्मीयता दाखवून दिली आहे. त्यामुळे दादांकडे कोणीही गेलं तरी त्याचं काम मार्गी लागणार याची खात्री आहे. त्याचवेळी कोणत्याही समाजाबाबत दादांकडून दुजाभाव केला जात नाही हे त्रिवार सत्य या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न असल्याचं सलीम सारंग यांनी नमूद केलं.





