बारामती : न्यूज कट्टा
बारामतीतील लखोबा लोखंडे उर्फ आनंद सतीश लोखंडे याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. लखोबाने दूध शितकरण मशीन खरेदी करण्यासाठी करार करून एकाकडून मोठी रक्कम हडपली आहे. या प्रकरणी संबंधितांकडून कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आनंद लोखंडे याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक व गैरव्यवहार केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
बारामतीनजीक असलेल्या एका मतदारसंघातील नेत्यांची जवळीक सांगून आनंद लोखंडे याने अनेकांना गंडा घातला आहे. त्याने विद्यानंद डेअरी प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका कंपनीला १० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर लखोबाने एका सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली होती.
आता या लखोबाने दूधासाठी मशीन खरेदी करण्यासाठी म्हणून एकाकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या दिल्ली आणि पुणे येथील कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार लखोबाने दूध शीतकरण यंत्र खरेदीसाठी सामंजस्य करार केला. त्यासाठी त्याने काहीजणांकडून पैसेही जमा केले. प्रत्यक्षात मात्र त्याने कोणतेही यंत्र खरेदी केले नाही. तसेच एका नामांकित कंपनीसोबत व्यावसायिक करार असल्याचं दाखवून अनेकांना गुंतवणुकीसा प्रवृत्त केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.
विविध गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम निश्चित केलेल्या कामासाठी न वापरणे, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, वार्षिक परतावे व आर्थिक अहवाल सादर न करणे, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे असे अनेक प्रकार आनंद लोखंडे आणि त्याच्या कंपनीकडून करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कंपनीचे खाते गोठवण्याची मागणीही तक्रारदारांनी केली आहे. त्यामुळं आता याबाबत संबंधित विभागाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.





