BABA SIDDIQUE MURDER : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; दुसऱ्या आरोपीच्या वयाची होणार तपासणी

मुंबई : न्यूज कट्टा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तिघांनी सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केला होता. पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करत १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने एका आरोपीला सात दिवसांची कोठडी सुनावली असून दुसऱ्या आरोपीच्या वयाबद्दल शहानिशा करण्याचे निर्देश दिले आहेत.

माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून या आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आरोपींच्या वकिलांनी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद करत त्याला वेगळी वागणूक द्यावी अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी संबंधित आरोपी हा सज्ञान असल्याचं न्यायालयात सांगितलं.

न्यायालयाने याबाबत सुनावणी करताना गुरमैल सिंग याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दूसरा आरोपी धर्मराज कश्यप याच्या वयाची चाचणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑसिफिकेशन टेस्ट करून मगच या आरोपीला न्यायालयात हजर करावं असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.

ऑसिफिकेशन टेस्ट कशी होते..?

कोणत्याही व्यक्तीचे वय निश्चित किती आहे, याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. त्यामध्ये हाडांचा एक्स-रे, सीटी स्कॅनच्या माध्यमातून हाडांच्या आकाराचा अभ्यास केला जातो. त्यावरून संबंधित व्यक्तीचे वय किती आहे याचा अहवाल दिला जातो.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!