मुंबई : न्यूज कट्टा
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. जे सलमानला मदत करतील त्यांना आम्ही प्रत्युत्तर देऊ असं नमूद करत सोशल मिडियावर एक कथित पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांनी याबाबत तपासही सुरू केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची काल रात्री हत्या करण्यात आली. त्यानंतर साबरमती कारागृहात असलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सदस्याने सोशल मिडियात एक कथित पोस्ट केली आहे. त्यामध्ये बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली असून सलमान खानला मदत करणाऱ्यांना आम्ही प्रत्युत्तर देऊ असं म्हटलं आहे. तसेच याच पोस्टमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचाही उल्लेख आहे.
व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये, सलमान खान.. आम्हाला हे युद्ध नको होते. पण आमच्या भावाचे (लॉरेन्स बिश्नोई) तुम्ही खूप नुकसान केले. आज बाबा सिद्धीकी शालिनतेचे पूल बांधत असला तरी एकेकाळी दाऊद इब्राहिमसोबत मोक्का कायद्यामध्ये अडकला होता. अनुज थापन प्रकरण आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण आणि प्रापर्टी डिलिंगशी जोडणे हेच त्याच्या मृत्युचे कारण आहे असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
या पोस्टमध्ये उल्लेख असलेल्या अनुज थापन यानं सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत असतानाच मृत्यू झाला होता. याच घटनेचा बदला म्हणून बाबा सिद्धीकींची हत्या असून जो कुणी सलमान खान किंवा दाऊद गँगला मदत करेल त्याला आम्ही नक्कीच उत्तर देऊ, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील निर्मलनगर येथे गोळीबार झाला. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तीन आरोपींनी अत्यंत जवळून बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील काही गोळ्या बाबा सिद्धीकी यांना लागल्या, तर काही गोळ्या त्यांच्या वाहनाला लागल्या. यासाठी आरोपींनी 9.9 एमएम पिस्तूलाचा वापर केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक केली असून गुरमेल हा हरियाणाचा, तर धर्मराज हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.





