बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी दिल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी बारामती नगरपरिषदेसमोर आंदोलनही केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रे १९ जुलैपर्यंत दिली जातील असं लेखी आश्वासन त्यावेळी देण्यात आलं. मात्र आता उपोषणाला ११ दिवस उलटून अद्यापही कोणत्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागासह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांबाबत शंका उपस्थित होत असून कारवाई न होण्यामागे नेमकं गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
बारामती शहरात मागील काळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमींचं पेव फुटलं आहे. शासनाची कोणतीच परवानगी न घेता आणि शासनाला कोणत्याही स्वरूपात कर न देता खुलेआम गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची लूट करण्याचा धंदाच या अकॅडमींकडून सुरू आहे. या अकॅडमींकडून अनेक विद्यार्थ्यांची फीसाठी अडवणूक करण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी या अकॅडमींच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
मागील वर्षी या अकॅडमींबद्दल आंदोलन केल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये फायर ऑडिट नसलेल्या अकॅडमी कायमस्वरूपी बंद केल्या जातील असा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील एका अधिकाऱ्याने मनमानी कारभार करत नियमबाह्य पद्धतीने अनेक अकॅडमींना फायर एनओसी दिल्या. याच अनुषंगाने मोहसीन पठाण यांनी माहितीच्या अधिकारात फायर एनओसीसंबंधित कागदपत्रांची मागणी केली. मात्र वर्ष उलटूनही त्यांना कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
अनेकदा पाठपुरावा करूनही कागदपत्रे मिळत नसल्याने यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप करत मोहसीन पठाण यांनी ११ जुलैपासून बारामती नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. दि. १३ जुलै रोजी बारामती नगरपरिषदेतील काही अधिकाऱ्यांनी मोहसीन पठाण यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी दि. १९ जुलैपर्यंत संबंधित कागदपत्रे देण्यात येतील असं लेखी आश्वासन देण्यात आलं. तसेच अग्निशमन अधिकाऱ्यावर कारवाईबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासनही देण्यात आलं.
या उपोषणाला आता जवळपास ११ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप अकॅडमींना दिलेल्या फायर एनओसीशी संबंधित कागदपत्रे देण्यात आली नाहीत. तसेच संबंधित अग्निशमन अधिकाऱ्यावर कारवाईबाबत प्रस्तावही दिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अग्निशमन अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे सातत्याने ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याने यात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची शंकाही उपस्थित होत आहे.
कधी प्रिंटर बंद; तर कधी अधिकारीच गायब
मोहसीन पठाण यांनी आपल्या उपोषणानंतर बारामती नगरपरिषद व अग्निशमन विभागाकडे पाठपुरावा करत दिलेल्या आश्वासानाची पूर्तता करण्याची मागणी केली. मात्र प्रत्येकवेळी नवनवीन उत्तरं दिली जात असल्याचा अनुभव पठाण यांना आला. अग्निशमन विभागाचे अधिकारीच उपस्थित नाहीत, तर कधी त्यांच्याकडील प्रिंटरच बंद आहे अशी जुजबी उत्तरे दिली जात असल्याने या प्रकरणात मोठा झोल असल्याची शक्यता नाकारता येत नाही.





