बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. शासनाच्या नियमांची राजरोसपणे पायमल्ली करणाऱ्या या अकॅडमींना प्रशासनातील अधिकारीच संरक्षण देत असल्यामुळे आता तक्रारदार मोहसीन पठाण यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संसद भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे.
बारामती शहरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अकॅडमी चालवल्या जात आहेत. त्यांच्याकडून पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये दाखवून त्यांना या अकॅडमीत शिकवले जात आहे. विशेष म्हणजे, अॅकडमीसाठी केंद्र शासनाने घालून दिलेल्या एकाही नियमाचे पालन केले जात नसल्याचे वास्तव पुराव्यानिशी समोर आणल्यानंतरही बारामतीत सुरू असलेल्या अकॅडमींना अभय मिळत आहे.
बारामतीतील अॅकडमींना फायर एनओसी घेण्याच्या तसेच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देऊन फायर एनओसी नसलेल्या अॅकडमी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी आजवर एकाही अकॅडमीवर कारवाई केलेली नाही. प्रोव्हीजनल एनओसीच्या नावाखाली या अॅकडमींना संरक्षण देण्यात आले.
याबाबत तक्रार केल्यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आजतागायत बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही. वास्तविक बारामतीत कोणत्याच अॅकडमीकडे अंतिम फायर एनओसी नाही. मात्र तरीदेखील अग्निशमन विभाग आणि मुख्याधिकारी कारवाई का करत नाहीत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.
स्थानिक प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे तक्रारदार मोहसीन पठाण यांनी आता थेट दिल्लीत संसद भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय पातळीवर पत्रव्यवहार करत बेकायदेशीर अॅकडमींच्या मनमानीला लगाम लावण्याची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.





