BARAMATI ACCIDENT : निरा-मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोने १६ वर्षीय मुलाला चिरडलं; संतप्त जमावाने टेम्पो पेटवला..!

निरा : न्यूज कट्टा

निरा डाव्या कालव्याच्या पूलावर एका भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निरा-मोरगाव रस्त्यावरील जगतापवस्ती येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टेम्पोचा पाठलाग करत तो पेटवून दिला. दरम्यान, अवघ्या १६ वर्षांच्या निष्पाप मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इजाज खुर्शीद सय्यद (रा. पोकळेवस्ती, निरा) असं या अपघात मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, इजाज हा आपल्या सायकलवरून जात असताना जगतापवस्ती येथील निरा डाव्या कालव्यावरील पूलावर भरधाव वेगातील आयशर टेम्पोने (क्र. एमएच १२ बीटी ४६२५) त्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये इजाज याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर आयशर चालक टेम्पोसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अपघात स्थळी उपस्थित ग्रामस्थ व वाहनचालकांनी त्याचा पाठलाग करत गुळूंचे येथे पकडले. त्यानंतर संतप्त जमावाने आयशर टेम्पो पेटवून दिला. या प्रकरणी अधिक तपास करंजेपूल पोलिस करीत आहेत. दरम्यान, या अपघातामध्ये इजाज सय्यद या निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!