BARAMATI BIG NEWS : बारामतीत हायवा, टिप्परसह १५३ अवजड वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई; १ लाख ५८ हजारांचा दंड वसूल

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता या बाबी लक्षात घेत बारामती वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दि. २७ जुलै ते ९ सप्टेंबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल १५३ अवजड वाहनांवर कारवाई करत १ लाख ५८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

बारामती वाहतूक शाखेकडून महिनाभरापूर्वी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या १६ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता डंपर, टिपर, काँक्रिट मिक्सर, मल्टी एक्सेल ट्रक, प्रायव्हेट बस अशा अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणारी अनेक वाहने आढळून आली. यामध्ये काही वाहने वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. दंड भरून कागदपत्रे सादर केल्याशिवाय ही वाहने मुक्त केली जाणार नाहीत.

वाहतूक शाखेच्या पथकाने परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, धोकादायक स्थितीत वाहन चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे आदी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत तब्बल १५३ वाहनांवर कारवाई करून १ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालवताना सर्व कागदपत्रे जवळ बाळगा आणि सुरक्षितता पाळा, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.

अवजड वाहनांवरील कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुभाष काळे, वाहतूक शाखेचे पोलीस जवान प्रदीप काळे, अजिंक्य कदम, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, प्रज्योत चव्हाण यांनी केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!