बारामती : न्यूज कट्टा
वीजेच्या डीपीमध्ये झालेल्या बिघाड काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे. हनुमंत सुनील सूर्यवंशी असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हनुमंत सूर्यवंशी हा वायरमनच्या हाताखाली कामाला होता. डीपी दुरुस्तीसह छोटीमोठी कामे करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होळ येथील डीपीचा बिघाड काढण्यासाठी तो गेला होता. यावेळी विजेचा शॉक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेची नोंद घेतली.
दरम्यान, नियमितपणे डीपी दुरुस्ती व अन्य कामे करत कुटुंबाला आधार देणाऱ्या या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.





