बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील गणेश रमेश केदारी या युवकाचा राहत्या घरी विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. घरात पाणी भरतानाच विजेचा शॉक बसून गणेश केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मोरगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मोरगाव परीसरातील एक मनमिळाऊ व होतकरू व्यक्ती म्हणून गणेश केदारी हे सर्वत्र परिचित होते. गणेश यांच्या राहत्या घराच्या परीसरातील नळाला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते. ते आपल्या घरात पाणी भरत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ मोरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
गणेश केदारी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गणेश केदारी हे मयुरेश्वर मंदिरातील सेवेकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे केदारी कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. केदारी यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





