BARAMATI BREAKING : गुन्ह्यात नाव न घेता वाहन सोडून देण्यासाठी मागितली ३० हजारांची लाच; बारामतीत पोलिसासह खासगी इसमावर गुन्हा दाखल

बारामती : न्यूज कट्टा    

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या एका अपघातात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वाहन परत देण्यासाठी म्हणून ३० हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या हस्तकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही काळात बारामती तालुका पोलिस ठाण्यातील कारभाराच्या अनेक चर्चा असतानाच ही घटना समोर आली आहे.

बारामती तालुका पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील माणिक जगताप आणि त्याचा हस्तक प्रवीण भाऊसाहेब भोसले या दोघांवर लाच मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदार यांच्यावर बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या आपघातप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि अपघातातील वाहन परत करण्यासाठी सुनील जगताप यांनी आपल्या हस्तकामार्फत ३० हजारांची मागणी केली होती.

तडजोडीनंतर १० हजार रुपये घेऊन वाहन सोडण्याचं आणि गुन्ह्यात नाव न घेण्याचं ठरवण्यात आलं. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे.

तालुका पोलिस ठाण्याचा कारभार चर्चेत      

बारामती तालुका पोलिस ठाणे मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. येथील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच याच पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर तरी या पोलिस ठाण्यात सुरू असलेला भोंगळ कारभार थांबणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!