BARAMATI BREAKING : बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला एसीबीनं रंगेहाथ पकडलं; सहीसाठी मागितली होती पावणेदोन लाखांची लाच..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी पावणेदोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी हा अधिकारी जिममध्ये १ लाख रुपये स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली.

बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगर परिषदेच्या नगर रचना विभागात प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगर रचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे यानं पावणेदोन लाख रुपयांची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासामुळे संबंधित बांधकाम व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहानिशा केली.

तडजोडी अंती या अधिकाऱ्याने एक लाख रुपये घेऊन ही सही करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार आज सायंकाळी सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका जिममध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या अधिकाऱ्यावर यापूर्वीही लाच प्रकरणी कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे. आज सायंकाळी झालेल्या कारवाईनंतर बारामती नगर परिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

गेले काही दिवसात विकास ढेकळे याच्या पैशांच्या हव्यासाचे अनेक किस्से चर्चेत होते. कोणतही काम करायचं झाल्यास हा अधिकारी पैशाशिवाय करत नव्हता. त्यामुळे बारामतीतील व्यावसायिकांसह सामान्य नागरिकही वैतागले होते. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर या अधिकाऱ्याच्या जाचातून सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांची मुक्तता झाली अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बारामती शहर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!