बारामती : नविद पठाण
बारामती नगरपरिषदेचा नगररचना अधिकारी विकास ढेकळे याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर बारामती नगरपरिषदेचा कारभारही चर्चेत आला असून विकास ढेकळे याचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. या अधिकाऱ्यानं पैशांसाठी कायपण ही वृत्ती ठेवत अक्षरश: हैदोस घातला होता. त्यातूनच या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तिसऱ्यांदा कारवाई झाल्याची बाब समोर आली आहे.
बारामतीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या फाईलवर सही करण्यासाठी बारामती नगरपरिषदेचा नगररचना अधिकारी विकास ढेकळे याने पावणेदोन लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर काल सायंकाळी सापळा रचून विकास ढेकळे याला १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली असून बारामती नगरपरिषदेचा कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे बारामतीचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असताना बारामतीत बांधकामांची कामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशावेळी बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना जलद सेवा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र बारामती नगरपरिषदेतील ठरविक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खूश केल्याशिवाय कामेच होत नाहीत अशी स्थिती आहे.
मुख्याधिकाऱ्यांचं दुर्लक्ष का..?
वास्तविक बारामती नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यावर जबाबदारी आहे. सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळाव्यात यासाठी मुख्याधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र बारामती नगरपरिषदेत प्रचंड भोंगळ कारभार सुरू असून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट केली जात आहे. याकडे मुख्याधिकारी कानाडोळा का करतात असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच आता नगररचना अधिकारी विकास ढेकळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर बारामती नगरपरिषदेत नेमकं चाललंय काय अशी विचारणा होवू लागली आहे.
पैशांसाठी कायपण
दुसरीकडे लाचखोर अधिकारी विकास ढेकळे याच्या अनेक कारमान्यांची यादीच समोर आली आहे. पैशांसाठी कोणत्याही थराला जायची तयारी असलेल्या या अधिकाऱ्यानं न्यायालयाच्या आदेशांचंही पालन केलं नसल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. इतकंच नाही तर तुम्ही पैसे द्या, मी कोणतंही काम लगेच मार्गी लावून देतो अशीच पद्धत या अधिकाऱ्यानं अवलंबली होती. त्यामुळे पैसे देईल त्याचंच काम होणार असा अलिखित नियमच रूढ झाला होता.
विकास ढेकळे याच्या आजवरच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे. बारामतीत या अधिकाऱ्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळं या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईचं आता सर्व स्तरातून स्वागत होत आहे. असं असलं तरी जाईल तिथे पैसा कमावणे एवढा एकमेव उद्देश ठेवून कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यावर आता प्रशासनाकडून काय कारवाई होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.





