बारामती : न्यूज कट्टा
बारामती एमआयडीसीच्या हद्दीतील विमानतळ आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आलं आहे. रिलायन्स समूहाने भाडेपट्टा कराराच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचं निदर्शनास आल्यानंतर महामंडळाने नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी पंचनामा करत या विमानतळाचा ताबा महामंडळाने घेतल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली.
राज्यातील बहुतांश विमानतळांचा रिलायन्स समूहासोबत करार होता. या विमानतळांचा ताबा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणाही केलेली होती. बारामतीत रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासोबत ५ नोव्हेंबर २००९ रोजी करार करून भाडेपट्ट्याने भूखंड मिळवला होता. मात्र या कराराचे या कंपनीकडून पालन केले जात नव्हते. त्यामुळं करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याचं निदर्शनास आल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून दि. १६ जानेवारी २०२५ रोजी नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतर आज दुपारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रत्यक्ष विमानतळावर दाखल होत पंचनामा करून विमानतळाचा भूखंड ताब्यात घेतला आहे. या कारवाईमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, सुनील दंडारे, उपअभियंता उपेंद्र गलांडे, क्षेत्र व्यवस्थापक महेश बल्लाळ, अॅड. मोरे यांच्यासह पोलिस यंत्रणेने सहभाग घेतला.
दरम्यान, आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने धडक कारवाई करत राज्यातील पाच विमानतळ ताब्यात घेतली आहेत. यामध्ये बारामतीसह लातूर, नांदेड, यवतमाळ, धाराशीव येथील विमानतळांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता या विमानतळांचा ताबा एमआयडीसीकडे राहणार असून धावपट्ट्या वाढवण्यासह विविध सोईसुविधा उपलब्ध होणार आहेत.





