बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वैशाली पाटील यांची हवेली पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी जिल्ह्यातील १६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये बारामती तालुका पोलिस ठाण्याचाही समावेश आहे.
बारामती तालुका पोलिस ठाण्याचा कार्यभार गेल्या वर्षभरापासून पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्याकडे होता. प्रमुख पोलिस ठाण्याचा कार्यभार मिळवणाऱ्या वैशाली पाटील या पहिल्या महिला अधिकारी होत्या. मात्र प्रत्यक्षात त्यांना म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. उलट त्यांच्या कार्यकाळात बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या कारभाराची सातत्याने उलटसुलट चर्चा होत राहिली.
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून बारामती एमआयडीसीचाही यात समावेश आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी रोखण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कसब प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीच्या वाहतूक शाखेत उत्तम कामगिरी केलेल्या चंद्रशेखर यादव यांच्याकडे बारामती तालुका पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे आता ते या पोलिस ठाण्याच्या कारभारात कशा पद्धतीने सुसूत्रता आणि पारदर्शकता आणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस आधीक्षकांच्या आदेशानंतर चंद्रशेखर यादव यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. तर बारामती वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी श्रीशैल चिवडशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वैशाली पाटील यांना हवेली पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.





