बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवक कांता बापूराव काळाणे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. १६ लाख ४६ हजारांच्या ग्रामपंचायत कामाच्या बिलासाठी त्यांनी ठेकेदाराकडे तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय कामे घेतात. त्यांनी बारामती तालुक्यातील पळशी गावच्या हद्दीत एका सिमेंट बंधाऱ्याचे काम केले होते. या कामापोटी त्यांना १६ लाख ४६ हजार रुपये मिळणार होते. या बिलाच्या मंजुरीसाठी ग्रामसेवक काळाणे यांनी तक्रारदाराला ४ टक्क्यांनुसार ६० हजार रुपये मागितले होते.
दरम्यानच्या काळात, काळाणे यांनी कामाच्या बिलाचा १४ लाख ९६ हजार रुपयांचा पहिला धनादेश देताना ३० हजार रुपये तक्रारदाराकडून रोख घेतले होते. त्यानंतर उर्वरीत १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश काढण्यासाठी ग्रामसेवक काळाणे हे उर्वरीत ३० हजार रुपये मागत होते. याबाबतची तक्रार संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानुसार बुधवारी सापळा रचून पळशी येथे एका रस्त्याच्या बाजूला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक काळाणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामसेवकाला लाच घेताना पकडण्यात आल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.





