बारामती : न्यूज कट्टा
बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींसह या अकॅडमीतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईत होणारी चालढकल, बारामती एमआयडीसीत बेकायदेशीर भूखंड बळकावणाऱ्यांना मिळणारे संरक्षण आणि भूमी अभिलेख कार्यालयात होणारी पैशांची मागणी याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नाही. त्यामुळे आता शासकीय अधिकाऱ्यांना पगार कमी पडत असल्याचं सांगत त्यांना अधिकचे पैसे मिळावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी भीक मागो आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. उद्या गुरुवारी दि. १३ मार्च रोजी ते हे आंदोलन करणार आहेत.
बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाई व्हावी यासाठी मोहसीन पठाण हे अनेक वर्षे लढा देत आहेत. याबाबत वेळोवेळी झालेल्या आंदोलनानंतर फायर एनओसी नसलेल्या अकॅडमी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र बारामती नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांनी बेकायदेशीरपणे या अकॅडमींना फायर एनओसी दिल्या आहेत. या प्रकारानंतर कुल्लरवार यांना निलंबित करण्याची मागणी करूनही तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश होऊनही या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे बारामती नगरपरिषदेच्याच बांधकाम विभागातही मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू असून आर्थिक तडजोड झाल्याशिवाय कामेच होत नाहीत. त्यामुळे गुरुवारी मोहसीन पठाण हे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या कार्यालयाबाहेर भीक मागो आंदोलन करणार आहेत.
तसेच बारामती शहरातील अकॅडमींमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देणाऱ्या शाळांबाबतही पठाण यांनी तक्रारी केल्या आहेत. शहरातील अकॅडमींकडून विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. विशेष म्हणजे हे विद्यार्थी संबंधित शाळेत हजरही नसतात. मात्र त्यांची हजेरी लावण्याचे काम संबंधित संस्था करत आहेत. याबाबत पुराव्यानिशी तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच अकॅडमीशी संबंधित विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतात त्यांची मान्यता कायमची रद्द करावी अशीही मागणी मोहसीन पठाण यांनी केली होती. मात्र गलथान प्रशासनाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही.
बारामती एमआयडीसी कार्यालयात सगळे मिळून दाबून खाऊ अशी अवस्था झाली आहे. नियमबाह्य पद्धतीने भूखंड देणे, बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने देणे, बनावट आदेशावर एकाच व्यक्तीला ५०-५० भूखंड देणे, अधिकाऱ्यांकडून आर्थिक तडजोडी करणे, वैभव घोरपडे नामक व्यक्ती व त्यांच्या परिवारातील सदस्यांना नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप, अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणे, एमआयडीसी हद्दीतील बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाईस टाळाटाळ करणे अशा अनेक तक्रारी आहेत. कागदोपत्री पुरावे दिल्यानंतरही एमआयडीसीचे अधिकारी कारवाई करत नाहीत.
प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून मोहसीन पठाण यांनी आता भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी १० ते ११.१५ वाजता बारामती एमआयडीसी कार्यालय, ११.२० ते १२.१५ वाजेपर्यंत बारामती पंचायत समिती, दुपारी १२.५० ते २ वाजेपर्यंत बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयात दुपारी ४ ते ५ या वेळेत भीक मागो आंदोलन केले जाणार आहे. बारामतीतील शासकीय अधिकाऱ्यांना शासनाचा पगार कमी पडतो. त्यामुळे ते नियमबाह्य कामांना महत्व देत असतात. त्यांना अधिकचे पैसे मिळावेत यासाठी आपण भीक मागो आंदोलन करणार आहोत असे मोहसीन पठाण यांनी सांगितले.





