बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील खंडोबानगर येथे झालेल्या भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर बारामतीतील प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बारामतीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच शहरात ठिकठीकाणी आढावा घेऊन गतिरोधक बसवले जाणार असून आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलकही लावले जाणार आहेत. प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
बारामती शहरातील खंडोबानगर येथे रविवार दि. २७ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ओंकार राजेंद्र आचार्य हे आपल्या दुचाकीवरून दोन मुलींसह जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रकने धडक दिल्याने चाकाखाली चिरडून ओंकार आचार्य यांच्यासह त्यांच्या मुली सई आणि मधुरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त होत असून वाढत्या अपघातांवर आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रांताधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे, वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी बारामतीत वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती दिली.
बारामतीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. तसेच वाहतूक समस्येवर काम करणाऱ्या यंत्रणेकडून सर्वेक्षण करून आवश्यक तिथे गतिरोधक बसवले जाणार आहेत. तसेच दिशादर्शक फलकही लावले जाणार आहेत. शहरातील शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि वाहतूक पोलिसांचा समावेश असलेली वाहतूक व्यवस्थापन समिती तयार करून त्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचं वैभव नावडकर यांनी सांगितलं.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजनेबाबत चर्चा केली. तसेच पुण्यातील काही सामाजिक संस्थांकडून शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि कोंडीबाबत आजच सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती वैभव नावडकर यांनी दिली.
शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वच विभागांची मदत घेतली जाणार असून येणाऱ्या काळात आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अंतर्गत रस्त्यांचं सर्वेक्षण करून वाहनांचा वेग कमी करण्याबाबत उपाययोजना राबवल्या जाणार असून आवश्यक तिथे गतिरोधक बसवले जातील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.





