बारामती : न्यूज कट्टा
बारामती एमआयडीसीमध्ये तब्बल २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्या माध्यमातून बारामती व परिसरातील दिड हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना दिली. यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू झाली असून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बारामती व्यापारी महासंघ आणि बारामती मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित मेळाव्यात अजितदादा बोलत होते. बारामतीच्या विकासाला नेहमीच महत्व देऊन विविध सुविधांबरोबरच महत्वाचे प्रकल्प उभारले आहेत. राज्यातील सर्वाधिक विकसित तालुका म्हणून बारामतीची ओळख असून शहाराबरोबरच तालुक्यातही अनेक विकासकामे मार्गी लावण्याचं काम आपण केल्याचं अजितदादांनी यावेळी नमूद केलं.
बारामतीच्या एमआयडीसीत ५० एकर जागेमध्ये २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्यातून बारामती आणि परिसरातील दीड हजार मुलांना रोजगार उपलब्ध होईल. याबाबत या उद्योगपतीशी चर्चा झाल्यानंतर मंत्रालय स्तरावरील यंत्रणेला सूचना दिल्या असून त्यांनीही तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहितीही ना. अजित पवार यांनी यावेळी दिली.
बारामतीकरांनी दिलेल्या संधीतून मला विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यातून मागील पाच वर्षात सर्वाधिक विकासकामे मार्गी लावण्याचं काम आपण केल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं. केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे राज्याला निधीची कमतरता भासत नाही. त्यामुळं यापुढेही महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.





