BARAMATI BREAKING : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीबद्दल सस्पेन्स कायम, भाजपही रिंगणात उतरणार..?

बारामती : न्यूज कट्टा

बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मुलाखती झाल्या असल्या तरी अद्याप उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच आता बारामती आणि माळेगावमध्ये महायुतीत असलेल्या भाजपनेही कंबर कसली असून या दोन्ही निवडणुकीत भाजपकडून उमेदवार निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुलाखतीनंतर उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असतानाही उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादीकडून उमेदवारांबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आल्याचं पहायला मिळत आहे.

दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. अनेकजण पक्षाकडून उमेदवारी मिळेल या आशेवर आहेत. मात्र निवडणूक लढवण्याबाबतचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्यामुळे बारामती आणि माळेगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात की एकमेकांविरोधात लढतात याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका गुलदस्त्यात असल्याचं चित्र आहे.

महायुतीत राष्ट्रवादीसोबत एकत्र असलेल्या भाजपनेही बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी केल्याचं दिसत आहे. भाजपकडून स्वतंत्र पॅनल केला जाईल, अशी चर्चा असून त्या अनुषंगाने पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. माळेगावमध्ये रंजन तावरे यांनी आपण पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने तयारीही केली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बारामती आणि माळेगावमध्ये प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवार यादीबद्दल सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवण्याच्या दृष्टीने बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे काही नावांचा समावेश होऊ शकतो अशीही चर्चा आहे. त्यामुळंच राष्ट्रवादीकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळत आहे. एकूणच उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!