बारामती : न्यूज कट्टा
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली. त्यामध्ये बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित झाले आहे. तर माळेगाव नगरपंचायतीत इतर मागास प्रवर्गातील महिलेला नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.
बारामती नगरपरिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर बारामती नगरपरिषदेला नवीन कारभारी मिळणार आहे. आज झालेल्या आरक्षण सोडतीत बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. प्रस्थापित चेहऱ्यांबरोबरच नवीन उमेदवारही नगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावताना पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचयातीची निवडणूकही होत असून माळेगावचे नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे. असे असले तरी माळेगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्रच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे आगामी काळात अनेक ठिकाणी राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे. त्यानुसार निवडणुकांचे गणित ठरणार असल्याने पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांना काही काळ वाट पहावी लागेल हे मात्र निश्चित..!





