BARAMATI BREAKING : बारामती तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड; नवीन चेहऱ्याला संधी देत अजितदादांचं धक्कातंत्र

बारामती : न्यूज कट्टा

बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत अध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामध्ये अनेकांची नावे पुढे आली होती. मात्र अजितदादांनी अचानकपणे संदीप बांदल यांना संधी देत धक्कातंत्र वापरले आहे. दरम्यान, संदीप बांदल यांच्या निमित्ताने एका स्वच्छ आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संदीप बांदल यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप बांदल यांनी यापूर्वी बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी काम केले आहे. त्यानंतर आता त्यांना बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

https://www.facebook.com/share/1BstrK9HWx/

बांदल यांच्या रूपाने प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाली असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, अजितदादांनी दिलेल्या संधीचे सोने करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यावर आपला भर असेल अशी प्रतिक्रिया संदीप बांदल यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, बारामती तालुकाध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. त्यात काही नावे सोशल मिडियात व्हायरल झाली होती. मात्र ऐनवेळी संदीप बांदल यांना संधी देत अजितदादांनी धक्कातंत्र वापरल्याची चर्चा होत आहे. पक्षाला वेळ देणारा, कार्यकर्त्यांना सामावून घेणारा चेहरा अध्यक्ष म्हणून द्यावा ही कार्यकर्त्यांची भावना समजून घेत नवीन चेहऱ्याला संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!