सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या चालू गाळप हंगामातील उसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना प्रति टन ३३०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. शासनाने निश्चित केलेला एफआरपी दर ३२८५ रुपये असून कारखान्याने त्यापेक्षा अधिक दर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून सध्या १० हजार टन प्रतीदिवसप्रमाणे गाळप होत आहे. आजअखेर एकूण २,०८,२४४ टन गाळप झाले असून १,९८,१०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. तर डिस्टीलरीमधून ९,२०,००० लिटर अल्कोहोल उत्पादीत केले आहे. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १,१५,५४,९२० युनिट वीजेची विक्री करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा विकासाची घोडदौड चालू असून चालू गाळप हंगामदेखील विक्रमी व यशस्वीरीत्या पार पडेल अशी खात्री कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. चालू हंगामात १४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्या अनुषंगाने तोडणी आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी सोमेश्वर कारखान्याचा ३२८५ रुपये प्रति टन एफआरपी दर निघत आहे. मात्र संचालक मंडळाने ३३०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप झालेल्या उसाची ३३०० रुपये प्रतिटननुसार होणारी रक्कम येत्या दोन दिवसांत सभासदांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. सोमेश्वर कारखान्याने नेहमीच उच्चांकी दर दिला असून यापुढेही सातत्य ठेवले जाईल, अशी माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली.





