BARAMATI BREAKING : मदनवाडीच्या पूलाखाली आढळलेला ‘तो’ मृतदेह कटफळमधील गर्भवती महिलेचा; विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पतीनेच केली हत्या

भिगवण : न्यूज कट्टा

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी पूलाखालील पाण्यात एका गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अवघ्या काही तासात या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनेच तिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा मृतदेह मदनवाडी पूलाखाली पाण्यात फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बारामती तालुक्यातील कटफळ येथे ही घटना घडली आहे.

दिपाली सुदर्शन जाधव (वय ३०, रा. कटफळ, ता. बारामती) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव (वय 36, रा. कटफळ) यानेच तिची हत्या केल्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी की,  दिपाली ही गर्भवती असल्याने तिच्या पोटातील बाळावरून तिचा पती सुदर्शन उर्फ रविराज जाधव याच्यासोबत दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता कटफळ येथील राहत्या घरी भांडण झाले.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर सुदर्शनने दिपालीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीचा मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून तो भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदनवाडी पूलाखाली पाण्यात फेकून दिला. त्यानंतर दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भिगवण परिसरातील मदनवाडी येथील पूलाखाली कुजलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर पती सुदर्शन याने दि. १४ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्याने पत्नीच्या हातावर रविराज नावाचा टॅटू असल्याची माहिती पोलिसांना दिलेली होती. भिगवण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मयत महिलेचा फोटो आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात प्रसारित केला होता. त्यानुसार हातावरील टॅटू आणि वर्णन यावरून या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सुदर्शन जाधव याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सुदर्शनने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी सुदर्शन ऊर्फ रविराज जाधव याला अटक केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे, सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजित मुळीक, मयुर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, कविता माने,शामल पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!