BARAMATI BREAKING : पर्यवेक्षक नेमणुकीसाठी माळेगाव आयटीआयच्या प्रभारी प्राचार्याने मागितली ४० हजारांची लाच; एसीबीने रंगेहाथ पकडलं..!

माळेगाव : न्यूज कट्टा

खासगी शैक्षणिक संस्थेत परीक्षेसाठी पर्यवेक्षक नियुक्त करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रभारी प्राचार्याला ४० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

अवधूत जाधवर असं या प्रभारी प्राचार्याचं नाव आहे. याबाबत एका खासगी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती अशी की, खासगी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटच्या परीक्षा घेतल्या जाणार असून संबंधित संस्थेतील ४५ विद्यार्थी या परीक्षेत सहभाग घेणार आहेत. त्यासाठी माळेगाव येथील शासकीय औद्योगिक संस्थेकडून पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. तक्रारदारांनी याचसंदर्भात माळेगाव आयटीआयकडे पत्र दिले होते.

या संस्थेत उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या प्राचार्य पदाचा तात्पुरता कार्यभार असलेल्या अवधूत जाधवर याने पर्यवेक्षक नेमणूक आणि परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रति विद्यार्थी २ हजार याप्रमाणे ४५ विद्यार्थ्यांची एकूण ९० हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी १० हजार रुपये तक्रारदाराकडून घेऊन पर्यवेक्षक नेमणुकीचे पत्र दिले होते. त्यानुसार नियुक्त झालेल्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली परीक्षा सुरू करण्यात आल्या. जाधवर याने उर्वरीत ८० हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.

संबंधित संस्थाचालकाने याबाबत दि. २३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यामध्ये तक्रारदाराला पर्यवेक्षक नेमणूक आणि परीक्षेत कोणताही अडथळा येवू नये यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. २४ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अवधूत जाधवर याला बारामती शहरातील हॉटेल सिटी इन येथे ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अवधूत जाधवर याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!