BARAMATI BREAKING : कांबळेश्वरमधील तीन सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार; माळेगाव पोलिसांनी केली कारवाई

माळेगाव : न्यूज कट्टा      

जीवे मारण्याचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, शालेय विद्यार्थीनी व महिलांची छेड काढणे अशा विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. माळेगाव पोलिसांनी ही कारवाई केली असून या तीनही गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.

सूरज पांडुरंग जाधव (वय २५), चेतन पांडुरंग जाधव (वय २४) आणि अर्जुन बाळासो आडके (वय २२) या कांबळेश्वर येथील रहिवाशी असलेल्या तीन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. माळेगाव पोलिस ठाण्यासह वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या तिघांनी दहशत निर्माण केली होती. नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी दुखापत करणे, शालेय विद्यार्थीनी व महिलांची छेड काढणे अशा अनेक गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग होता. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील घटकांमध्ये या आरोपींबद्दल भीतीचे व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती.

या पार्श्वभूमीवर त्यांच्यात कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि त्यांच्या दहशतीला आळा बसावा या उद्देशाने माळेगाव पोलिस ठाण्याकडून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या तीनही गुन्हेगारांवर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. त्यांना पुणे जिल्ह्यासह पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर, पोलिस कॉन्स्टेबल जालिंदर बंडगर यांनी ही कारवाई केली. त्यांना गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार महेश बनकर, पोलिस हवालदार रामदास बाबर यांचे सहकार्य लाभले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!