बारामती : न्यूज कट्टा
घरबसल्या पैसे कमवा अशा आशयाखाली एका वृत्तपत्रात आलेली जाहिरात पाहून गुंतवणूक करणं बारामती शहरातील भलतंच महागात पडलं आहे. सातजणांच्या या टोळीने पेन्सिल तयार करण्याच्या व्यवसायासाठी म्हणून वेळोवेळी तब्बल १४ लाख ६० हजार रुपये उकळल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी या सातही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शोभा रमेश खलाटे (रा. नवीन कोर्टामागे, बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय शर्मा, राजीव कुमार, श्री जयराम, अत्तार संग, अजय वीर सिंग, रघुनाथ उर्फ रघुभाई, आणि विष्णु पटेल अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ३ मार्च २०२४ रोजी शोभा खलाटे यांनी एका वृत्तपत्रात घरबसल्या कमवण्याची संधी अशा आशयाखाली आलेली एक जाहिरात पाहिली होती. ही जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी यात दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला.
त्यावेळी संबंधित इसमाने खलाटे यांना पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय करण्याची संधी असल्याचं सांगत तुम्हाला चांगले पैसे मिळतील असं आमिष दाखवलं. त्यामुळे खलाटे यांनी या व्यवसायासाठी पैसे गुंतवण्याची तयारी दाखवली. याचाच गैरफायदा घेत या टोळीने खलाटे यांच्याकडून वेगवेगळ्या क्रमांकांवर तसेच बँक खात्यांवर जवळपास १४ लाख ६० हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय सुरू झाला नाही. तसेच कोणतीही उपकरणे या टोळीकडून मिळाली नाहीत.
हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचं लक्षात आल्यानंतर शोभा खलाटे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी संजय शर्मा, राजीव कुमार, श्री जयराम, अत्तार संग, अजय वीर सिंग, रघुनाथ उर्फ रघुभाई, आणि विष्णु पटेल या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन चेके हे करीत आहेत.





