बारामती : न्यूज कट्टा
गुन्हा करणारी व्यक्ती ही नेहमी वेगवेगळी पद्धत अमलात आणते याची आपण अनेक उदाहरणे पाहतो. असाच एक अचंबित करणारा प्रकार बारामती तालुक्यातील पिंपळी येथे घडला आहे. आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेणाऱ्याच्या लहान भावाचं पतीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा छडा लावत संबंधित अपहरणकर्त्याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील पिंपळी येथील एका अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात दिली होती. यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलाच्या भावाने ज्याच्या पत्नीला फूस लावून पळवून नेले, त्यानेच हे अपहरण केल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच माझ्या पत्नीला आणून सोडत नाही तोपर्यंत या मुलाला ताब्यात देणार नाही अशी धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन पथकांद्वारे या मुलाचा शोध सुरू केला.
संबंधित आरोपी पोलिस आपल्या मागावर आहेत हा अंदाज आल्याने सातत्याने संबंधित कुटुंबीयांना स्थळ बदलून हुलकावणी देत होता. शेवटी पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून ताब्यात घेतले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाचीही सुटका केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके, कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलिस हवालदार यशवंत पवार, मोहंमद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.





