बारामती : न्यूज कट्टा
तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही कार ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.
दि. २४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली.
यानंतर ती कार सिटी इन चौकात थांबवण्यासाठी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला. पुढे दि.२८ मे रोजी तीच कार गांधी चौकात वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे यांना दिसली. मात्र त्यावेळीही ती थांबवता आली नाही. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली.
अखेर बारामती शहरातच ती चारचाकी शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतली. कृष्णा अभिजीत क्षीरसागर (रा. माऊली नगर, बारामती) हा चालक ती कार चालवत होता. या कारवर काळ्या काचा लावल्या होत्या. तसेच नंबर प्लेट आणि विमाही नव्हता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नसल्यानं या वाहनचालकाला ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
तसेच बेदारकारपणे वाहन चालवत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला. या कारच्या काळ्या काचा कमी करण्यात आल्या असून मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिमही काढण्यात आलेली आहे. ही कार बारामती वाहतूक शाखेने जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.





