BARAMATI CRIME : बारामतीत प्रेमी युगलाला कोयत्यानं मारहाण करत लुटलं; बारामती तालुका पोलिसांकडून तिघांना अटक

बारामती : न्यूज कट्टा

बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात प्रेयसीसमवेत बसलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव)  (मूळ रा. नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्याजवळ येत लोखंडी सत्तूर,कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले.

त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे २१ ग्रॅम वजनाची चैन (किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) व २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व ‘परत इकडे यायचं नाही’ अशी धमकी देत तेथून पसार झाले. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम ३०९(६),३(५) अन्वये दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कसून चौकशी करत या प्रकरणातील आरोपी निष्पन्न केले.

त्यानुसार प्रसाद गणपत भोसले (वय २४) धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) आणि कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता.बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांच्या पथकाने केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!