माळेगाव : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात मागील काही दिवसात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. अशातच माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरून एक मिनी बस चोरीला गेल्याची घटना दि. २८ ऑगस्ट रोजी घडली होती. माळेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबी तपासत यातील आरोपीला ताब्यात घेत ७ लाख रुपये किमतीची मिनी बसही जप्त केली आहे.
प्रदीप रामचंद्र शिंदे (रा. कऱ्हावागज, ता. बारामती) असं या आरोपीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरील मयुरेश्वर बॅटरी या दुकानाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फोर्स मोटर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस लावण्यात आलेली होती. दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान ही मिनीबस अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याबाबत सचिन बाबासो कोकरे (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाला या प्रकरणाचा तपास करण्याच्या सुचना केल्या. या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासत तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर एका टेम्पो चालकावर संशय बळावला. त्यानुसार प्रदीप शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारणा केल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीची फोर्स माटर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राहुल पांढरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अंमलदार अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.





