माळेगाव : न्यूज कट्टा
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न झाल्याचं भासवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून अपहृत मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी ही माहिती दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबद्दल मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करत एक पथक तयार केलं. पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर, सहाय्यक फौजदार संजय मोहिते, पोलिस कॉन्स्टेबल अमोल वाघमारे, जयसिंग कचरे यांचा या पथकात समावेश करण्यात आला.
या पथकाने लागलीच संबंधित मुलीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये संबंधित आरोपी अल्पवयीन मुलीला बीड येथे घेऊन गेल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार तपास पथकाने बीडमध्ये जाऊन अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले. स्वप्नील उर्फ सोपान दिगंबर पवार (वय २१, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड) असं या आरोपीचं नाव आहे. त्याने या अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचं भासवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.
त्यानुसार पोलिसांनी अपहरण व बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर संबंधित अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर हे करत आहेत.





