बारामती : न्यूज कट्टा
सोशल मिडियावर वेगवेगळ्या स्टोरी ठेवून स्टाईल मारणं एकाला भोवलं आहे. ‘आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे’ असा धमकीवजा व्हिडिओ टाकून ‘सरकार नो कॉम्प्रोमाईज’ असं कॅप्शन टाकणाऱ्या तरुणाचा बारामती तालुका पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्याच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर वंजारवाडीत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि आणि पोलिस जवान पो. कॉ. राजू बन्ने यांनी खातरजमा करून बन्ने यांचे तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत कायद्याचा बडगा उगारला आहे. श्रीकांत घुले याच्यावर बीएनएस कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस जवान राजेश बन्ने यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो. हवा. किशोर वीर हे करत आहेत.
कुणाचीही दादागिरी चालणार नाही
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात तसेच एमआयडीसी, सूर्यनगरी परिसरात कोण दादागिरी, दहशत करत सामान्य नागरिकांना त्रास देत असल्यास ९९२३६३०६५२ या क्रमांकावर माहिती द्यावी, संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कळवले आहे.





