BARAMATI CRIME : तलवार आणि कोयता बाळगत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; बारामती तालुका पोलिसांनी एकाला केली अटक

बारामती : न्यूज कट्टा

बारामती एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समर्थ सिद्ध मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) असं या आरोपीचं नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलिसांना समर्थ मल्हारे हा इसम तलवार बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ सूत्रे हलवत एमआयडीसीतील श्रायबर डायनामिक्स डेअरी परिसरात छापा टाकून मल्हारे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने तलवार घरी ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर एक तलवार आणि एक कोयता मिळून आला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर, राहुल लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!